सावु पेटती मशाल, सावु आग ती जलाल
सावु पेटती मशाल, सावु शोषितांची ढाल, सावु मुक्तिचं पाऊल....
साद दिली पाखरांना, सारं रान धुंडाळुन
फडफडले ते पंख, झेपावल नवं गाणं
सावु वाघिण आमची, तिनं फोडली डरकाळली
थरथरल्या काचा कोया, गड ढासळल गं बाई...
दुध ज्ञानाचे पाजले, गर्भ यातना सोसुन
येल मांडवाला जाई, ज्ञान चांदण पिऊन
हरण चालली कळपात, कशी निर्भय तोऱ्यात
स्वाभिमानाची गं उब, आत्मभान पांघरुन...
घुसमट काळजाची, माझ्या आजही पदरी
कधी ढिली कधी जाम, माझ्या येसणीची दोरी
जरी मोकळा गं श्वास, माझ मन जायबंदी
झळकते गं वरुन,अंधारल आतमंदी
मुक्या माऊलीची साद, सावु घुंगाराचा नाद
सावु लावण्याचा साज, सावु झाकलेली लाज...
आता नको कोंडमारा, नको विषारी हा वारा
नको दासीपण आता, नको जुलमाचा पहारा
ज्योत लाविलीस सावु, वणवा मी पेटविण
तु जे शिल्प कोरलेस, ते मी बोलके करीन...
ज्योती क्रांतीबा जणांचा, तशी क्रांतीज्योत सावु
त्यांनी लावियेले रोप, आम्ही नभाला भिडवु
सावु क्रांतीची गं येल, सावु समतेची चाहुल
सावु शोषितांची ढाल, सावु मुक्तीच पाऊल...
- कबीर कला मंच
No comments:
Post a Comment