Total Pageviews

131801

Wednesday, 8 March 2017

खरा तो एकची धर्म। जगाला प्रेम अर्पावे - साने गुरुजी




खरा तो एकची धर्म। जगाला प्रेम अर्पावे।।
जगी जे हिन अतिपतित
जगी जे दिन पददलित
तया जाऊन उठवावे।जगाला प्रेम अर्पावे।।
जयांना कोणी ना जगती
सदा जे अंतरी रडती
तया जाऊन सुखवावे।जगाला प्रेम अर्पावे।।
समस्ता धीर तो द्यावा
सुखाचा शब्द बोलावा 
अनाथा साह्य ते द्यावे।जगाला प्रेम अर्पावे।।
सदा जे आर्त अतिविकळ
जयांना गांजिती सकळ
तया जाऊन हसवावे।जगाला प्रेम अर्पावे।।
कुणा ना व्यर्थ शिणवावे
कुणा ना व्यर्थ हिणवावे
समस्ता बंधू मानावे।जगाला प्रेम अर्पावे।।
प्रभुची लेकरे सारे
तयाला सर्वही प्यारी
कुणा ना तुच्छ लेखावे।जगाला प्रेम अर्पावे।।
जिथे अंधार औदास्य
जिथे नैराश्य आलस्य
प्रकाशा तेथ नव न्यावे।जगाला प्रेम अर्पावे।।
असे जे आपणापाशी
असे जे वित्त वा विद्या
सदा ते देतची जावे।जगाला प्रेम अर्पावे।।
भरावा मोद विश्वात
असावे सौख्य जगतात
सदा हे ध्येय पूजावे।जगाला प्रेम अर्पावे।।
असे हे सार धर्मांचे
असे हे सार सत्याचे
परार्था प्राणही द्यावे।जगाला प्रेम अर्पावे।।
जयाला धर्म तो प्यारा 
जयाला देव तो प्यारा
तयाने प्रेममय व्हावे।जगाला प्रेम अर्पावे।।
खरा तो एकची धर्म। जगाला प्रेम अर्पावे।।

-साने गुरुजी
धुळे तुरुंग, मे १९३४

No comments:

Post a Comment