संपविला देह जरी संपणार नाही
मती
धर्माच्या गारदयांनो कशी रोखणार गती ।।
धर्माच्या गारदयांनो कशी रोखणार गती ।।
आठवा तुकोबाची गाथा तुम्ही बुडविली
तुका मारुणीया त्याची खबर दडविली
त्या तुक्याच्या अभंगाची आज तुम्हा वाटे भीती
धर्माच्या गारदयांनो कशी रोखणार गती ।।
आठवा चार्वाकाला तुम्ही भस्म केले होते
नाव इतिहासतुनी लुप्त झाले होते
त्याच चार्वाकाचे तुम्हा वारस आज दावु किती
धर्माच्या गारदयांनो कशी रोखनर गती ।।
भिक्खूंच्या शिराला दिल्या मोहरा शंभर
कसा रक्ताने भिजविला अहिंसेचा तो संगर
गळे चिरून धम्माचे संपली का सांगा नीती
धर्माच्या गारदयांनो कशी रोखणार गती ।।
सत्यासाठी सॉक्रेटीस विष प्याला होता
कोपर्निकस वरती पोपचा रोष आला होता
मार्टिन ल्यूथर धर्मद्रोही ठरला होता
गॅलिलिओ बघा तुरुंगात सडला होता
बघा उजेडाची फुलं धडका मरणाला देती
धर्माच्या गारदयांनो कशी रोखणार गती ।।
सत्य चिरडून इथे धर्म वाढलाय
फुल्यांसाठी मारेकरी त्यांनी धाडलाय
गांधीजींचा धर्मासाठी खून पाडलाय
गोळ्या खावूनिया पाश निपचित पडलाय
न्यायासाठी भोतमांगे रोज रडलाय
रक्ताच्या थारोळ्यात सफदर पडलाय
त्याच सत्यासाठी आज दाभोळकरांची आहुती
त्याच सत्यासाठी आज पानसरेंची आहुती
धर्माच्या गारदयांनो कशी रोखणार गती ।।
तुम्ही उजेडाची फुलं खुडली कीती सांगा
धर्मक्रौर्याचा तुमच्या हिशेब आज मांडा
अंधाराला घेऊन आमच्या उजेडाशी भांडा
अंधाराला घेऊन आमच्या उजेडाशी भांडा
अज्ञानचा होईल अंत, असत्याची होईल माती
धर्माच्या गारदयांनो कशी रोखानार गती ।।
-सचिन माळी