Total Pageviews

Thursday, 22 March 2018

चवदार तळ्याच्या काठी रोवून पाय खंबीर

चवदार तळ्याच्या काठी रोवून पाय खंबीर
राहिला उभा दलितांचा सेनानी रणगंभीर ll

दुबळ्यांची सेना मागे लक्तरे हाच गणवेष
परि होता संचारलेला अंगात नवा आवेश ll

त्या पराक्रमी भीमाने क्षणमात्र झाकले नेत्र
ओंजळीत घेता पाणी हे घडले तीर्थक्षेत्र ll

कापरे अधर्मा भरले रुढींची शकले झाली
चवदार तळ्याचा काठी जन्माला क्रांती आली ll

ती भीमगर्जना घुमली संघर्षसिद्ध बुद्धाची
ललकारी मानवतेची दुंदुभी नव्या युद्धाची ll

या दलितांनो, छलितांनो व्हा सज्ज तुम्ही नवसमरा
अन्याय मिटवण्यासाठी व्हा तयार बंधूनी कमरा ll

या पुढे न चालायाची अपमानित जीवनसरणी
रे पराक्रमाने तुमच्या छळणारे आणा चरणी ll

जे धुळीत जगती त्यांच्या जीवनास येवो अर्थ
चवदार तळे होवू दे समतेचे मंगल तीर्थ ll

--वसंत बापट

Saturday, 13 January 2018

आभाळाची आम्ही लेकरं ...



आभाळाची आम्ही लेकरं, काळी माती आई
जात वेगळी नाही आम्हा, धर्म वेगळा नाही

श्रमगंगेच्या तीरावरती, कष्टकर्यांची आमुची वस्ती
नाव वेगळं नाही आम्हा, गाव वेगळा नाही

इनाम आम्हा एकच ठावे, घाम गाळुनी काम करावे
मार्ग वेगळा नाही आम्हा, स्वर्ग वेगळा नाही

माणुसकीचे अभंग नाते, घाम गाळुनी काम करावे
पंथ वेगळा नाही आम्हा संथ वेगळा नाही

कोटी कोटी हे बळकट बाहू, समतेचा रथ ओढून नेऊ
आस वेगळी नाही आम्हा, ध्यास वेगळा नाही

- वसंत बापट

Monday, 18 December 2017

दबे पैरों से उजाला आ रहा है ...



दबे पैरों से उजाला आ रहा है
फिर कथाओं को खंगाला जा रहा है
धुंध से चेहरा निकलता दिख रहा है
कौन क्षितिजों पर सबेरा लिख रहा है
चुप्पियाँ हैं जुबाँ बनकर फूटने को
दिलों में गुस्सा उबाला जा रहा है
दूर तक औ देर तक सोचें भला क्या
देखना है बस फिज़ां में है घुला क्या
हवा में उछले सिरों के बीच ही अब
सच शगूफे सा उछाला जा रहा है
नाचते हैं भय सियारों से रंगे हैं
जिधर देखो उस तरफ़ कुहरे टँगे हैं
जो नशे में धुत्त हैं उनकी कहें क्या
होश वालों को संभाला जा रहा है
स्थगित है गति समय का रथ रुका है
कह रहा मन बहुत नाटक हो चुका है
प्रश्न का उत्तर कठिन है इसलिए भी
प्रश्न सौ -सौ बार टाला जा रहा है
सेंध गहरी नींद में भी लग गयी है
खीझती सी रात काली जग गयी है
दृष्टि में है रोशनी की एक चलनी
और गाढ़ा धुआँ चाला जा रहा है ।।

टिप - हे गाणं व्हिडिओ स्वरूपात बघण्यासाठी भेट द्या
कलासंगिनी माणगाव येथील शिबिरात कबीर कॅफे (नीरज आर्या) भारतातील प्रसिध्द बँड सोबत परफॉम् करताना. कलासंगिनी निमंत्रक, एल्गार सांस्कृतिक मंचाचा, एक अष्टपैलू कलाकार धम्मरक्षित रणदिवे.

Thursday, 9 March 2017

संपविला देह जरी... - सचिन माळी


संपविला देह जरी संपणार नाही मती
धर्माच्या गारदयांनो कशी रोखणार गती ।।
आठवा तुकोबाची गाथा तुम्ही बुडविली
तुका मारुणीया त्याची खबर दडविली
त्या तुक्याच्या अभंगाची आज तुम्हा वाटे भीती
धर्माच्या गारदयांनो कशी रोखणार गती ।।

आठवा चार्वाकाला तुम्ही भस्म केले होते
नाव इतिहासतुनी लुप्त झाले होते
त्याच चार्वाकाचे तुम्हा वारस आज दावु किती
धर्माच्या गारदयांनो कशी रोखनर गती ।।

भिक्खूंच्या शिराला दिल्या मोहरा शंभर
कसा रक्ताने भिजविला अहिंसेचा तो संगर
गळे चिरून धम्माचे संपली का सांगा नीती
धर्माच्या गारदयांनो कशी रोखणार गती ।।

सत्यासाठी सॉक्रेटीस विष प्याला होता
कोपर्निकस वरती पोपचा रोष आला होता
मार्टिन ल्यूथर धर्मद्रोही ठरला होता
गॅलिलिओ बघा तुरुंगात सडला होता
बघा उजेडाची फुलं धडका मरणाला देती
धर्माच्या गारदयांनो कशी रोखणार गती ।।

सत्य चिरडून इथे धर्म वाढलाय
फुल्यांसाठी मारेकरी त्यांनी धाडलाय
गांधीजींचा धर्मासाठी खून पाडलाय
गोळ्या खावूनिया पाश निपचित पडलाय
न्यायासाठी भोतमांगे रोज रडलाय
रक्ताच्या थारोळ्यात सफदर पडलाय
त्याच सत्यासाठी आज दाभोळकरांची आहुती
त्याच सत्यासाठी आज पानसरेंची आहुती
धर्माच्या गारदयांनो कशी रोखणार गती ।।

तुम्ही उजेडाची फुलं खुडली कीती सांगा
धर्मक्रौर्याचा तुमच्या हिशेब आज मांडा
अंधाराला घेऊन आमच्या उजेडाशी भांडा
अंधाराला घेऊन आमच्या उजेडाशी भांडा
अज्ञानचा होईल अंत, असत्याची होईल माती
धर्माच्या गारदयांनो कशी रोखानार गती ।।

-सचिन माळी

पोटाच्या खळगीसाठी ... तांडा चालला, तांडा चालला ...


पोटाच्या खळगीसाठी, बांधून बिऱ्हाड पाठी
तांडा चालला, तांडा चालला ...
ह्या दुष्काळी लोकांची पोथीच कुणी ना वाची
एक दिसाची भाकर भाजी मुळीच नाही गाठी
तांडा चालला...
धान्याच्या शोधासाठी पाण्याच्या शोधासाठी
केवळ आपल्या पोटासाठी मुकादमाच्या पाठी
तांडा चालला ...
ही गाडी ढळली आता ही मूठ आवळली आता
या गाडीचा गाडीवान हा लढेल क्रांतीसाठी
तांडा चालला ...
समतेचा वाही वारा, ना पिळवणुकीला थारा
त्या नगरीच्या शोधासाठी, नव्या माणसासाठी
तांडा चालला ...
माणूस नवा घडवावा, हा लोक लढा वाढवावा
एकजुटीचा आवाज आमचा, आभाळ आता गाठी

तांडा चालला ...