Total Pageviews

Thursday, 22 March 2018

चवदार तळ्याच्या काठी रोवून पाय खंबीर

चवदार तळ्याच्या काठी रोवून पाय खंबीर
राहिला उभा दलितांचा सेनानी रणगंभीर ll

दुबळ्यांची सेना मागे लक्तरे हाच गणवेष
परि होता संचारलेला अंगात नवा आवेश ll

त्या पराक्रमी भीमाने क्षणमात्र झाकले नेत्र
ओंजळीत घेता पाणी हे घडले तीर्थक्षेत्र ll

कापरे अधर्मा भरले रुढींची शकले झाली
चवदार तळ्याचा काठी जन्माला क्रांती आली ll

ती भीमगर्जना घुमली संघर्षसिद्ध बुद्धाची
ललकारी मानवतेची दुंदुभी नव्या युद्धाची ll

या दलितांनो, छलितांनो व्हा सज्ज तुम्ही नवसमरा
अन्याय मिटवण्यासाठी व्हा तयार बंधूनी कमरा ll

या पुढे न चालायाची अपमानित जीवनसरणी
रे पराक्रमाने तुमच्या छळणारे आणा चरणी ll

जे धुळीत जगती त्यांच्या जीवनास येवो अर्थ
चवदार तळे होवू दे समतेचे मंगल तीर्थ ll

--वसंत बापट